Tuesday, July 15, 2025

*महाराष्ट्र भूमीतील दुर्लक्षित क्रांतिकारक जतचे वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या संघर्षाची गाथा*

 *गांधी बाबा परवानगी देऊ देत एका रात्रीत सायबांचे बंगले जाळून टाकतो* 


 *महाराष्ट्र भूमीतील दुर्लक्षित क्रांतिकारक वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या संघर्षाची गाथा* 

गांधी बाबा परवानगी देऊ देत एका रात्रीत सायबांचे बंगले जाळून टाकतो, हे शब्द आहेत बेळगावच्या हिंडलगा जेल मधील क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांचे. तत्कालिन मुंबई प्रांतातील चार जिल्ह्यात ब्रिटीश अंमलदार, गावगाड्यातील सरकारी अधिकारी यांच्या शोषणाविरोधात बंड करणारा हा नायक म्हणजेच सांगली जिल्हा जन्मभूमी असणाऱ्या सिंदूर ता. जत येथील क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण होय. गेल्या 100 वर्षात केवळ नाटक व लोकगीतात जिवंत असणाऱ्या या नायकाचा इतिहास मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांनी समोर आणला आहे. कन्नड नाटक, कथा , कादंबरी आणि लोकगीतातून वर्णलेल्या या नायकास संशोधनाद्वारे इतिहासात आणण्याचे काम मानसिंगराव कुमठेकर, प्रा. गौतम काटकर यांनी केले आहे. 
 
    १९१० ते १९२० च्या दरम्यान तत्कालिन जत संस्थानात भीषण दुष्काळ पडला होता. सामान्य रयत या काळात अन्न पाण्यावाचून तडफडत होती. याचवेळी सिंदूर लक्ष्मण हे जन्मगाव असणाऱ्या सिंदूर येथे चावडीवर कोतवालीचे काम करीत होते. इंग्रज सरकारचे प्रतिनिधी असलेले वतनदार पाटील व त्यांचे मदतनीस असलेले कुलकर्णी हे दुष्काळाने होरपळलेल्या रयतेची कसी लूट करतात हे त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. इंग्रज अधिकारी व गावगाड्यातील त्यांचे प्रतिनिधी यांच्या शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या धोरणाविरोधात सिंदूर लक्ष्मण यांनी बंडाची भूमिका घेतली. या बंडात त्यांना रडरट्टी ता. अथणी येथील साबू, गोपाळ, नरसू या नात्याने भाचे असणाऱ्या तिघांनी, निडोणी जि. विजापूर येथील दुंडाप्पा या सहकाऱ्यांनी मदत केली. कोतवालीच्या नोकरीची पर्वा न करता या सर्वांनी बिळूर ता. जत येथील मनोहर कुलकर्णी या सावकाराच्या वाड्यावर दरोडा टाकून लुटीची रक्कम व धान्य परिसरातील गोरगरिबांना वाटून टाकली. 
    या घटनेमुळे कोतवालीची नोकरी सोडून सिंदूर लक्ष्मण व सहकारी फरार झाले. त्यांनी जत संस्थान सोडून कृष्णाकाठावरील जमखंडी बिळगी पेठ्यात आश्रय घेतला. यानंतर त्यांनी गरिबांची लुबाडणूक करणाऱ्या गावातील सावकाराच्या वाड्यावर दरोडा घालून पुन्हा लुटलेली रक्कम गरिब रयतेस वाटून टाकली. या घटनेने जत संस्थानी मुलूख व इंग्रजी अंमल असणाऱ्या भागात खळबळ माजली. यानंतर पोलिसांनी सिंदूर लक्ष्मण यांना अटक केली मात्र नरसूसह धाडसी भाच्यानी जतचा जेल फोडून सिंदूर लक्ष्मण यांची सुटका केली. भूमीगत असताना सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांना तेग्गी ता. बिळगी येथील वेंक्कणगौडा पाटील यांनी आश्रय देऊन मदत केली.
     संस्थानी प्रदेश व इंगजी मुलखात सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने इंगज पोलिस व संस्थानी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर लावण्यात आले. या दरम्यान कुल्लोळी ता. जमखंडी येथे झालेल्या चकमकीत पोलिस फौजदार कलाल याचे शिर लक्ष्मण व भाचा नरसू यांनी धडावेगळे केले. धडावेगळे केलेले शिर आणून जतच्या मुख्य वेशीला बांधले. ही वार्ता कळताच इंग्रजासह संस्थान पोलिस व विजापूर विजापूर जिल्हा पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले. सर्व घटना घडत असताना पोलिसांनी वीर सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांना अटक केली. मात्र त्यांनी जमखंडीचा जेल फोडून पुन्हा पलायन केले. या टोळीचे धैर्य पाहून इंग्रज पोलिस आता हादरुन गेले होते.  
     सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांना पकडण्यासाठी विजापूर जिल्हा पोलिस प्रमुख ओ गारमण, बेळगाव जिल्हा पोलिस उपअधीक्षक जॉन डिसिल्वा , पोलिस इन्स्पेक्टर गोकर्ण (बेळगाव), पोलिस इन्स्पेक्टर घोरपडे ( मुधोळ संस्थान) यांच्यासह 500 इंग्रज व संस्थानी पोलिस नियुक्त करण्यात आले होते. तरी देखील गरिबांचा वाली ठरलेल्या सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांनी होसूर जिल्हा बागलकोट, सिद्धापूर जिल्हा बागलकोट, अमिनगड जिल्हा बागलकोट येथे दरोडे टाकून मिळालेली लूट बिळगी पेठ्यात गोरगरिबांना वाटली.  
   एप्रिल 1922 मध्ये यडहळ्ळी या गावातील गुजरानं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या, कर्जाच्या माध्यमातून लुबाडणूक केली होती. या सावकारास थेट आव्हान देऊन दिवसा त्याच्या वाड्यावर दरोडा टाकला. कर्ज खताच्या मिळालेल्या वह्या फाडून टाकल्या. रोख रक्कम आणि धान्य गरिबांना वाटले. 1920 मध्ये सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांनी तत्कालीन बेळगाव जिल्ह्यात 8 व विजापूर जिल्ह्यात 6 दरोडे टाकून लुटलेली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली. इंग्रजांना मदत करणाऱ्या व गोरगरिबांना नाडणाऱ्य धनदांडग्यांना त्यांनी इशाराच दिला.
    इंग्रज पोलिस व संस्थानी पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळं सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांनी कृष्णाकाठावर असणाऱ्या गौरवाड, शेडशाळ ता. शिरोळ येथे आश्रय घेतला होता. फितुरीमुळे बेळगाव जिल्हा पोलीस उपअधीक्षक जॉन डिसिल्वा यांनी त्यांना अटक केली. अटकेंनतर या सर्वांची रवानगी हिंडलगा जेल, बेळगाव येथे करण्यात आली. 
    सिंदूर लक्ष्मण व सहकारी यांना हिंडलगा जेलमध्ये ठेवण्यात आलेल्या बराकीतच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबुराव ठाकूर ही होते. ठाकूर यांनी सिंदूर लक्ष्मण व नरसू यांनी चित्तथरारकपणे हिंडलगा जेल फोडल्याची घटना कथन केली आहे. जेलमध्ये असताना सिंदूर लक्ष्मण यांनी श्री ठाकूर यांना गांधी बाबा परवानगी देऊ देत एका रात्रीत सायबांचे बंगले जाळून टाकतो , (गांधी अवरु बरे ओप्पणी कोडली. वंदे रात्रीयल्ली साहेबर बंगलेगळु सुट्ट बिडुत्तेवीं) असे म्हटले होते. यावरुन स्वातंत्र्य चळवळीबाबत सिंदूर लक्ष्मण यांची जागरुकता दिसून येते. 
    सिंदूर लक्ष्मण आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एप्रिल 1922 मध्ये मोठ्या फौजफाट्यासह मागावर असलेल्या विजापूर जिल्हा पोलीस प्रमुख ओ गारमन यांच्या तुकडीसोबत तुंबरमट्टीच्या डोंगरात चकमक झाली. या चकमकीत सिंदूर लक्ष्मण यांनी पोलीस प्रमुखांची हॅट नेम धरुन बंदुकीने उडवली. यानंतर सिंदूर लक्ष्मण व सहकाऱ्यांनी निजाम संस्थानात आश्रय घेतला. शहाबाद (जि. यादगीर) येथे झालेल्या चकमकीनंतर सर्वजण बिळगी पेठेत आश्रयाला आले.          
    याच दरम्यान आश्रयदाता ठरलेल्या तेग्गीच्या पाटलास इंग्रज पोलिसांनी अटक करुन वतन जप्त करण्याची धमकी दिली. शेवटी 15 जुलै 1922 रोजी कप्पूर पडियेव्व डोंगर (नागराळ, ता. बिळगी) येथे तेग्गीच्या पाटलांनी जेवण्यासाठी बोलावले. फितुरी झाल्याने या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या इंग्रज पोलिसांनी सिंदूर लक्ष्मण यांना गोळ्या घातल्या. इंग्रज पोलिस, सरकारी अंमलदार, वतनदार यांच्यावर जरब बसवून गोरगरिबांचा कैवारी ठरलेल्या या महान क्रांतीवीराचा असा दुर्दैवी अंत झाला.

 *प्रा.गौतम काटकर 9881550706*
*मानसिंगराव कुमठेकर 9405066065*





No comments:

Post a Comment

*महाराष्ट्र भूमीतील दुर्लक्षित क्रांतिकारक जतचे वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या संघर्षाची गाथा*

  *गांधी बाबा परवानगी देऊ देत एका रात्रीत सायबांचे बंगले जाळून टाकतो*   *महाराष्ट्र भूमीतील दुर्लक्षित क्रांतिकारक वीर सिंदूर लक्ष्मण यांच्य...